लग्न किंवा इतर समारंभांत सोज्वळ रूप खुलतं ते फक्त नऊवारीतच आणि सध्या वधूच्या कलेक्शनमध्ये हाच ट्रेंड दिसून येतो.
वेगवेगळ्या समारंभांत अगदी सहजतेने ही साडी नेसता यावी आणि वावरता यावे, यासाठी त्या शिवून देण्याचे प्रमाणही वाढले आहे. ठुशी, नथ, अंबाडा, कुड्या, पाटल्या, बांगड्या या साजेशा सर्वांगपूर्ण शृंगारासह नऊवारीतील रूप खूप लोभसवाणं दिसतं. म्हणूनच "जुनं ते सोनं' असण्याची प्रचिती या ठिकाणी नक्कीच येते.
काळानुरूप फॅशन बदलत जाते. जुन्या फॅशन पुन्हा नवीन रूपातही येतात. अशीच सध्या अगदी लोकप्रिय असलेली म्हणजे नऊवारी साडी. अर्थात नऊवारीला काही "फॅशन' म्हणता येणार नाही. पण रोजच्या पठडीतून जरा हट के केलं की झालीच ना फॅशन. सध्या बहुतेक लग्नसमारंभांचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की, वधूच्या कलेक्शनमध्ये ट्रेंड आहे तो "नऊवारी'चा. लग्नात किमान शास्त्रीय, धार्मिक विधींसाठी तरी नऊवारीचा साज चढतोच.
न्यू जनरेशनमधील मुलींना नऊवारी कशी नेसायची हे माहीत नसले तरी त्यावर खूप सोपा उपाय आहे. कारण "रेडिमेड नऊवारी' अगदी सहज उपलब्ध होत आहेत. आपल्या आवडीची साडी देऊन हव्या त्या प्रकाराची नऊवारी साडी शिवून मिळते. त्यामुळे ही शिवून मिळालेली साडी नेसणे अगदीच सोईचे आणि सोपे. नऊवारीला मागणी असण्याचे कारण म्हणजे ती नेसल्यावर येणारा डिसेंट लुक.
मोठ्या काठा-पदराची नऊवारी, पारंपरिक दागिने, नथ, अंबाडा किंवा खोपा, त्यावर मोगरा-अबोलीचा गजरा हे रूप खूपच लोभसवाणे दिसते. या मराठमोळ्या रूपात आपण नटावे, सजावे, चारचौघांनी कौतुक करावं अशी प्रत्येकच मुलीची अपेक्षा असते. रोजच्या जीन्स, ट्राऊझर, पंजाबी ड्रेस या लुकमधून आपण किती वेगळे आणि आकर्षक दिसू शकतो, यासाठी हा पेहराव अगदी आवर्जून वापरला जातोच.
- नऊवारी साडीमध्ये अनेक प्रकार आहेत. यापैकी पेशवाई नऊवारीला अधिक मागणी असते. या साडीला ओचा असतो. त्यामुळे तिला पेशवाई पद्धतीची नऊवारी म्हणतात. याखेरीज मराठमोळी नऊवारीला कोल्हापूर आणि परिसरात जास्त मागणी असते. या साडीला काष्टा असतो. ओचा ठेवला जात नाही.